Pune accident case : न्यायालयीन वाद न वाढवता थेट समझोता ; जखमीला 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई

प्रभात वृत्तसेवा
पुणे – रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अंपगत्व आलेल्या व्यक्तीला तब्बल एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. २०२२ मधील अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकास दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले. अपघातामुळे त्यांना ७८ टक्के अपंगत्व आले. या प्रकरणात न्यायालयीन वाद वाढविण्याऐवजी मध्यस्थीच्या मार्गाने हा प्रश्न सोडविला.सात फेब्रुवारी २०२२ ला संदीप गोपाल महाजन हे पत्नीसमवेत स्कूटरवरून जात असताना त्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली.
अपघातात महाजन यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर चिंचवड पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतरच्या उपचारांसाठी महाजन यांना तब्बल १६ लाख रुपये खर्च झाले. महाजन यांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागल्याने, त्यांचे नियमित कामकाज विस्कळित झाले. ते एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांना दरमहा ६० हजार पगार होता. त्यामुळे त्यांनी एक कोटी २० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी गो डिलीट विमा कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता.
हे प्रकरण प्रलंबित राहण्याऐवजी मध्यस्थीमार्फत तोडगा काढण्याचे ठरले. मध्यस्थी अधिकारी ॲड. अतुल गुंजाळ यांच्या प्रयत्नातून अर्जदार व विमा कंपनीमध्ये समझोता झाला. या समझोत्याअंतर्गत अर्जदारास एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे ठरले. महाजन यांच्यावतीने ॲड. कांतिलाल सोनावणे, ॲड. सी. एस. पाटील आणि ॲड. पुनम बोरसे यांनी बाजू मांडली.
न्यायालयीन सुट्टीतही मध्यस्थी प्रक्रिया पार पडली. विमा कंपनीच्या वकिलांनी तसेच अर्जदाराच्या वकिलांनी यात सक्रिय सहभाग घेतला. या समझोत्यामुळे न्यायालयीन खटला लांबला नाही, वेळ आणि खर्चाची मोठी बचत झाली. या प्रकरणात प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनातून मध्यस्थीची प्रक्रिया यशस्वी झाली.





