Pune Accident : हलगर्जीपणा नडला! क्रेनच्या टपावरून तोल जाऊन चाकाखाली आल्याने मजुराचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – क्रेनच्या टपावर बसलेला मजुर चाकाखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. वारजे माळवाडी पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राजकिशोर बाबूलाल यादव ( २४, रा. आंबेगाव खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी क्रेनचालक रघुनाथ शंभू पंडीत ( ३५, सध्या रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक, मूळ रा. रजनपुरा, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यादवचा भाऊ बैजनाथ ( २८) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, राजकिशोर यादव मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी आहे. तो पुण्यात मजुरी करतो. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास क्रेनचालक पंडीत हा मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन क्रेन घेऊन निघाला होता. यादव क्रेनच्या टपावर बसला होता. चांदणी चौकापासून काही अंतरावर मालविका अपार्टमेंटसमोर टपावर बसलेल्या यादवचा तोल गेला. क्रेनच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करत आहेत.





