Pune: पुण्यातील आघाडीचे विश्वकर्मा विद्यापीठ आणि टाटा ऑटोकॉम्प गोशन ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘टाटा ऑटोकॉम्प-व्हियू अकादमी डिप्लोमा कोर्स ऑन इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळा पुण्याजवळील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये उत्साहात पार पडला. भारतामध्ये वेगाने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी भविष्योन्मुख आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेला हा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम उद्योगातील व्यावसायिकांना प्रगत ईव्ही तंत्रज्ञान आणि भविष्यातील मोबिलिटी प्रणालींमध्ये कौशल्यवृद्धी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात बॅटरी तंत्रज्ञान, बॅटरी पॅक डिझाईन, इलेक्ट्रिक मोटर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, थर्मल मॅनेजमेंट, चार्जिंग सिस्टिम्स, ईव्ही सुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, ट्रबलशूटिंग तसेच उदयोन्मुख ईव्ही तंत्रज्ञान अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता. चार सत्रांमध्ये विभागलेल्या या अभ्यासक्रमात तांत्रिक अध्ययनासोबत असाइनमेंट्स, सिम्युलेशन्स, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर देण्यात आला. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागी विद्यार्थ्यांना संयुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी संशोधन, नवकल्पना आणि अनुभवाधारित शिक्षणासाठी उद्योग सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने लाईव्ह प्रोजेक्ट्स, उद्योगांशी संवाद, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले. भरत अगरवाल म्हणाले, “विश्वकर्मा विद्यापीठात आम्ही शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न ठेवता ते थेट उद्योग आणि समाजाशी जोडण्यावर विश्वास ठेवतो. हे सहकार्य भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ईव्ही क्षेत्रासाठी भविष्योन्मुख मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा भागीदारीमुळे शैक्षणिक शिक्षण आणि प्रत्यक्ष तांत्रिक गरजा यांतील दरी कमी होण्यास मदत होत असून देशाच्या शाश्वत मोबिलिटी उद्दिष्टांनाही हातभार लागत आहे.” तर श्रद्धा जुडीवाल यांनी सांगितले, “ईव्ही उद्योग झपाट्याने विकसित होत असून सातत्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. या डिप्लोमा कार्यक्रमामुळे शॉप फ्लोअर ऑपरेटर्सना ईव्ही कौशल्ये आणि करिअर विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्योन्मुख मनुष्यबळ घडविण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.” या पहिल्या बॅचच्या यशस्वी पूर्णतेमुळे भारतामध्ये नवकल्पना, कौशल्यविकास आणि शाश्वत मोबिलिटी शिक्षणाला चालना देण्यासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्य किती प्रभावी ठरू शकते, हे अधोरेखित झाले आहे.