Pune | दस्तनोंदणीतून ३३ हजार कोटींचा महसूल

पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 16 लाख 66 हजार दस्तनोंदणीतून 33 हजार कोटींचा महसुल जमा झाला आहे. यंदा राज्य शासनाने नोंदणी विभागाला 55 हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले असून, या उद्दिष्टाच्या 60 टक्के इतका महसूल जमा झाला आहे.
राज्याला महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे.
राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर फ्लॅट खरेदी- विक्रीचे व्यवहार होत आहेत, तसेच पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक या शहरांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. यामुळे दस्त नोंदणीतून सरकारला महसूल मिळतो.
शासनाकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो प्रकल्प आदींबरोबर विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहे. या कामांसाठी शासनालाही मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. शासनाकडे जमा होणारा हा महसूल विविध विकासकामांवर खर्च केला जातो. जमा होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा, याचा निर्णय होत असतो. त्यामुळे नोंदणी विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलाकडे शासनाचे लक्ष असते.
महसुलात होत आहे वाढ
यंदा राज्य शासनाने रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ न करता रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवले. त्याचाही परिणाम म्हणून दस्तनोंदणीच्या संख्येबरोबर महसुलातही वाढ झाली. पर्यायाने शासनाच्या तिजोरीतही वाढ झाली आहे. याचसह राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरांत मोठ्या प्रमाणावर दुकाने, सदनिकांचे खरेदी- विक्रीचे व्यवहार होत आहेत. शिवाय शहरालगतच्या गावांमध्ये जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार होत आहे. यामुळे महसुलातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जमा महसूल
महिना – दस्त संख्या – महसूल
एप्रिल – 2,24,318 – 3 हजार 767 कोटी
मे – 2,52,331 – 4 हजार 335 कोटी
जून – 2,05,907 – 4 हजार 400 कोटी
जुलै – 2,44,211 – 4 हजार 700 कोटी
ऑगस्ट -2,35,467 – 5 हजार 31 कोटी
सप्टेंबर- 1,85,429 – 3 हजार 998 कोटी
आॉक्टोंबर – 2,33,008 – 5 हजार 86 कोटी
नोव्हेंबर – 85, 791 – 1 हजार 758 कोटी (दि. 20 नोव्हेंबरपर्यंत)





