लाडक्या बहिणींसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला; मंत्री अशोक उईके संतापले, म्हणाले, ‘हा अपप्रचार थांबवा…’

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्यास होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्य सरकारने पुन्हा आदिवासी विकास विभागाचा निधी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे दीड हजार रुपये लाभ जमा करण्यासाठी आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे.
याआधी देखील दोन वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखाचा निधी वर्ग करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा अदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यावर आता राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नाही, त्यामुळं आमचा निधी कमी केला हा अपप्रचार थांबवला पाहिजे असे मत मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केले.
मंत्री अशोक उईके म्हणाले, गेल्या वर्षी आदिवासी विभागाला 17 हजार 80 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तर यावर्षी त्यात 3 हजार 200 कोटींची वाढ होऊन खात्याला यावर्षी 21 हजार 500 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळं आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नाही, असा विश्वास अशोक उईके व्यक्त केला.
तसेच, राज्यासोबतच केंद्राकडूनही आमच्या योजनांना आर्थिक सहकार्य दिले जाते. लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना असून तिची अंमलबजावणी करणे सरकार म्हणून आमची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळं आमचा निधी कमी केला हा अपप्रचार थांबवला पाहिजे, असं मत मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केले.
नेमकं प्रकरण काय?
सरकारने अनुसूचित जमाती उपाययोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठीही मे महिन्याच्या सुरुवातीलाच ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी खात्यातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे.





