Bhushan Gavai | महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. मात्र राज्यात आल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नसल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या भूषण गवई यांच्या सत्कार कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. याबाबत सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर तातडीने राज्य सरकारने भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अतिथी नियम-२००४ अनुसार घोषित करण्यात आलेल्या राज्य अतिथींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या तसेच ज्यांना राज्य अतिथी समजण्यात येत आहे अशा मान्यवरांची विमानतळावर स्वागताची व निरोपाची व्यवस्था राजशिष्टाचार उपविभागाकडून करण्यात येते. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील राजशिष्टाचार अधिकारी राज्य अतिथीचे स्वागत करण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करतात. मान्यवरांच्या स्वागतासाठी कोण उपस्थित राहणार? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्यात मुंबई दौऱ्यावर असताना मुख्य सचिव अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलीस महासंचालक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि राज्यात अन्य संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच पोलीस आयुक्त अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी मान्यवरांचे स्वागत करावे. याशिवाय अतिथी यांच्या भेटीदरम्यान ज्या विभागाच्या कामकाजासंदर्भात भेट देत असतील त्या विभागाने मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात असेल जिल्हाधिकार्यांनी समन्वयासाठी क्लास वन अधिकारी नेमणे बंधनकारक असेल, असंही परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.Bhushan Gavai | दरम्यान, या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. Bhushan Gavai | हेही वाचा: ‘बाबा तुमच्या आठवणी…’ ; राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी भावुक