मंत्र्यांसाठी आयपॅडची खरेदी; ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च

iPad for Ministers | राज्य सरकारकडून मंत्रिमंडळासाठी अॅपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात येणार आहे. ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मंत्री, राज्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकरिता ॲपल ब्रँडचे आयपॅड आणि संबंधित वस्तू खरेदी करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे.
मंत्र्यांसाठी ५० आयपॅड खरेदी केले जाणार असून त्यांची किंमत १ कोटी ६ लाख ५७ हजार आहे. आयपॅडसोबतच मॅजिक की-बोर्ड, ॲपल पेन्सिल, कव्हर, ॲडप्टर आणि केबल दिले जाणार आहे. या साहित्यासह एका आयपॅडची किंमत २ लाख १३ हजार रुपये आहे.
आय पॅडच्या खरेदीसह प्रति मॅजिक किबोर्डची 31 हजार 188 रुपये, 7 हजार 268 रुपये अॅपल पेन्सिलसाठी आणि 8 हजार 850 रुपये कव्हरची किंमत आहे. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश
सरकारकडून संबंधित कंपनीला 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची ऑर्डर देण्यात आली आहे. या खरेदीसाठी रेडियस सिस्टम्स या सेवा पुरवठादार संस्थेला पुरवठा कंत्राट देण्यात आले. तसेच हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. iPad for Ministers |
यासंदर्भात ९ एप्रिल २०२५ रोजी पहिली ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तांत्रिक छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्याने १३ मे २०२५ रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेनुसार प्राप्त अर्जांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक छाननीनंतर रेडियस सिस्टम्सला पात्र ठरवण्यात आले. iPad for Ministers |
हेही वाचा:
युरोपियन मित्र, कॅनडा, भारत आणि आता मस्क… ट्रम्पनी सर्वांना केलं दूर ; काय होणार याचे परिणाम ?





