Pune : सात दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

पुणे – राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांला ध्वनिप्रदूषण संबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे.
त्यानुसार गणेशोत्सवासाठी दि. ३० ऑगस्ट ते दि. 4 सप्टेंबर व दि. ६ सप्टेंबर असे ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास सूट देण्यात आली आहे.
यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी केले आहेत. याशिवाय नवरात्रोत्सवासाठी १ व २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
ध्वनिप्रदूषण नियम २००० मधील नियम ३ व ४ व ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) चे पालन करण्यात यावे, झोनिंगप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल, असेही आदेशात नमूद केले आहे.





