धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची झुंबड अखरेच्या दिवशी १८३ जणांनी भरला अर्ज कात्रज/धनकवडी – पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.३०) राजकीय वातावरणात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ३६, ३७ आणि ३८ मध्ये एकाच दिवसात तब्बल १८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांमधील एबी फॉर्मचा सस्पेन्स आणि जागा वाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिल्याने इच्छुकांची मोठी धावपळ उडाली. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. गेल्या आठवड्याभरापासून संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेने आज अचानक वेग घेतला. प्रभाग क्र. ३६ (सहकारनगर-पद्मावती) : आज ६१ अर्ज आले त्यांनतर एकूण संख्या ८५ झाली. प्रभाग क्र. ३७ (धनकवडी-कात्रज डेअरी) : आज ४२ अर्ज आल्याने एकूण संख्या ४९ वर पोहोचली. प्रभाग क्र. ३८ (बालाजीनगर-आंबेगाव) : येथे सर्वाधिक चुरस असून ७८ नव्या अर्जांसह एकूण आकडा १०८ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर, सहायक अधिकारी सुरेखा भणगे, मनीषा भुतकर आणि त्यांच्या पथकाने ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. आता, ३१ डिसेंबरला अर्जांची तांत्रिक छाननी केली जाणार आहे. एबी फॉर्मसाठी चढाओढ आणि पक्षांतर… भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीसाठी पहाटेपर्यंत खलबते सुरू होती. पक्षाची अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली होती. ज्यांना स्वतःच्या पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेली, त्यांनी तातडीने दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केले. यामुळे यावेळीच निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले. कार्यालयात झुंबड, बाहेर शक्तिप्रदर्शन… धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाहेर आज उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि समर्थकांच्या गर्दीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी पोहोचले. कार्यालयात केवळ दोन व्यक्तींना प्रवेशाची परवानगी असताना कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे यंत्रणेवर मोठा ताण आला. ३० डिसेंबर अखेरपर्यंत एकूण ८३८ अर्जांची विक्री झाली, छाननीनंतर रिंगणात किती उमेदवार उरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.