Doctor Fraud: अकरा डॉक्टरांना १ कोटी १० लाखांचा गंडा!
Doctor Fraud:

– महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार
– तीन प्राध्यापकांविरोधात एसीबीकडे तक्रार
Doctor Fraud: पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ डॉक्टरांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
कायमस्वरूपी नियुक्तीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये घेतल्याचा आरोप असून, एकूण एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे देऊनही वर्षभरानंतर नियुक्ती न झाल्याने डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) धाव घेतली आहे. महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात नोव्हेंबर २०२५ मध्ये महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत एमडी आणि एमएस पदवीधारक २८ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार होती
. याअंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन डॉक्टरांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टरांनी संबंधितांकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना वारंवार टाळल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, प्राध्यापक डॉ. नानासाहेब भांगरे यांनी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासह पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक डॉक्टरकडून सुरुवातीला अडीच लाख व भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांनी डॉक्टरांकडून पैसे गोळा करून पुढे पोहोचविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत तक्रारदार डॉक्टरांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर चौकशीसाठी पुणे महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागण्यात येईल.
ट्रस्टकडे तक्रार मात्र तोडगा नाही
संबंधित डॉक्टरांनी सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षांकडे तक्रार केली होती. मात्र, तेथेही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. या तक्रारीमुळे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





