Pro Kabaddi League 2024 (Match 101) | हरियाणा स्टीलर्सचा तेलुगु संघावर एकतर्फी विजय…

Pro Kabaddi League 2024 (Haryana Steelers vs Telugu Titans) :- अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने तेलुगु टायटन्स संघाचा 46-25 असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला हरियाणा संघाने 28-09 अशी मोठी आघाडी घेतली होती.
धाकड़ छोरों के क़हर से बचना मुश्किल ही नहीं नामुमकिन है! 🔥💙#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #TeluguTitans pic.twitter.com/sfA3KUQvfx
— ProKabaddi (@ProKabaddi) December 9, 2024
हरियाणा स्टीलर्स संघाने सुरुवातीपासूनच जोरदार व पल्लेदार चढाया व पकडीचे नियोजन करताना तेलुगु संघाच्या खेळाडूंना रोखले. हरियाणा संघाच्या विनय, राहुल, शिवम पठारे, मोहम्मद रेझा शादलुई या चढाई पटूंनी खोलवर चढाया करीत गुणांची वसुली केली. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढविला. मध्यंतरापर्यंत तरी तेलुगु संघाला दोन्ही आघाड्यांवर फारसा सूर गवसला नाही.
उत्तरार्धात तेलुगु संघाच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र हरियाणा संघाने त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना हरियाणा संघ 34-16 असा आघाडीवर होता.
शेवटची पाच मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने 40-17 अशी मोठी आघाडी मिळवली होती. हरियाणा संघाकडून शिवम पठारे याने बारा गुण तर विनयने सात गुण नोंदविले. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल याने तेरा गुणांची नोंद केली.





