Pro Kabaddi League 2024 (Semi-Final 1) : हरियाणा स्टीलर्सचा दबदबा कायम, यूपी योद्धाजला धूळ चारत गाठली अंतिम फेरी…

Pro Kabaddi League 2024 (Semi-Final 1, Haryana Steelers vs UP Yoddhas) : पीकेएल 11 च्या चालू मोसमात, साखळी टप्प्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या हरियाणा स्टीलर्सचा हंगामाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यूपी योद्धाजविरुद्ध सामना झाला. गतवर्षीच्या उपविजेत्या हरियाणा संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह स्टार कबड्डीपटू परदीप नरवालचा जुना संघ यूपी योद्धजचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे.
धाकड़ छोरों ने किया धमाका 💥
योद्धाज़ को हराकर फाइनल में बनाई जगह 💪💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs #HaryanaSteelers #UPYoddhas pic.twitter.com/UGoMdz3GHw
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2024
या बाद फेरीच्या (नॉकआउट) लढतीत स्टीलर्सने यूपी योद्धाजचा अवघ्या 3 गुणांनी म्हणजेच 28-25 अशा फरकाने पराभव केला. या दोन्ही संघांनी अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. हरियाणाकडून या सामन्यात शिवम पटारे 7 गुणांसह अव्वल रेडर ठरला तर राहुलने उत्कृष्ट डिफेंससह (बचाव) 5 गुण घेतले. तर दुसरीकडे गगन गौडा सुपर 10 सह यूपीचा अव्वल रेडर बनला, परंतु त्याची कामगिरी व्यर्थ गेली आणि संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
हरियाणा स्टीलर्सचा दबदबा कायम…
या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, हरियाणा स्टीलर्स लीग टप्प्यानंतर टेबल टॉपर होता. त्यामुळे संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला होता. हरियाणाने साखळी फेरीत 22 पैकी 16 सामने जिंकले होते आणि 6 गमावले होते. संघाने 84 गुणांसह अव्वल स्थानावर राहून आपले वर्चस्व कायम राखले होते. हरियाणाचा संघ गेल्या मोसमात विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला होता पण त्यांना अपयश हाती लागले होते. अंतिम सामन्यात पुणेरी पलटणने त्यांचा पराभव केला होता. दुसरीकडे यूपी योद्धाजने पहिल्या एलिमिनेटर सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा 46-18 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
रविवारी होणार अंतिम सामना…..
आता दुसऱ्या उपांत्य फेरीत दबंग दिल्ली आणि तीन वेळा चॅम्पियन पटना पायरेट्स आमनेसामने आहेत. हा सामना सध्या चालू आहे. या सामन्यातील विजयी संघ आता 29 डिसेंबर रोजी पुण्याच्या कोर्टवर (बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे) हरियाणा स्टीलर्सशी भिडणार आहे. हा सामना रात्री 8.00 वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 2 HD आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच हा सामना तुम्ही Hotstar मोबाईल ऍप्लिकेशन आणि पीकेएलच्या अधिकृत वेबसाइटवर देखील (लाइव्ह स्ट्रीमव्दारे) पाहू शकाल.





