Priya Marathe: तेजस्विनी लोणारीची भावनिक आठवण : ‘प्रियासारखी अभिनेत्री रिप्लेस करणं कठीण होतं’

Priya Marathe : मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का देत हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठेनं अल्पवयातच जगाचा निरोप घेतला. वयाच्या केवळ ३८व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत तिचं निधन झालं. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही तिची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत तब्येतीच्या कारणामुळे तिला काम सोडावं लागलं आणि तिच्या जागी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची निवड झाली.
तेजस्विनीची भावनिक आठवण
प्रियाच्या निधनानंतर तेजस्विनी लोणारीनं तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. एका मुलाखतीत ती म्हणाली, “प्रियाला रिप्लेस करताना मला खूप दडपण आलं होतं. कारण ती अत्यंत प्रतिभावान होती. तिचं बोलणं, तिचं अभिनयातील वजनदारपणं… हे सगळं माझ्यासाठी आव्हान होतं. त्यामुळे तिच्याकडून काही विचारायचीसुद्धा हिंमत झाली नाही. मी ठरवलं की आपलं काम आपण मनापासून करायचं.”
तेजस्विनी पुढे म्हणाली की, “मी प्रियाशी बोलले होते, पण तिच्यासोबत असं होईल असं मला वाटलंच नव्हतं. तिनं परदेशात जाऊन नाटकं, दौरे केले होते. ती दुसऱ्या मालिकेतही काम करत होती. त्यामुळे ती ठीक होईल असं वाटत होतं. पण इतक्या लवकर ती गेली यावर अजूनही विश्वास बसत नाही.”
तिनं सांगितलं की प्रियाच्या अंत्यसंस्काराला ती जाऊ शकली नाही, कारण तिची प्रकृती ठीक नव्हती. “एवढी तरुण आणि गुणी अभिनेत्री गेली याचं दुःख कायम राहील,” असं ती म्हणाली.
प्रिया मराठेचा निरोप
‘तुझेच मी गीत गात आहे’ सोडताना प्रियानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिनं आरोग्याच्या समस्या असल्यामुळे मालिका सोडत असल्याचं स्पष्ट केलं. “शूटिंग आणि आरोग्य सांभाळणं कठीण जातंय. माझ्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं, पण टीमला वेळ देता येत नाही म्हणून हा प्रवास थांबवते,” असं ती म्हणाली होती.
प्रियाची कारकीर्द
प्रिया मराठेनं ‘चार दिवस सासूचे’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या मालिकांमधून महत्त्वाच्या भूमिका केल्या. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही तिची शेवटची मालिका ठरली, तर ‘अ परफेक्ट मर्डर’ हे तिचं अखेरचं नाटक होतं.





