Ankita Lokhande : ट्रोलिंगनंतर अंकिता लोखंडेची ‘प्रिया मराठे’साठी भावुक पोस्ट; म्हणाली….

Ankita Lokhande | Priya Marathe | अभिनेत्री प्रिया मराठे हिने वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ती कॅन्सर या आजाराने ग्रस्त होती. तिच्या अकाली एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधानाची बातमी धक्का देणारी आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यात प्रियाने अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
प्रियाच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी प्रियाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन तिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. परंतु अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर प्रियासाठी एकही पोस्ट लिहिली नव्हती. यावरूनच नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. अंकिताच्या फोटोंवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
मात्र, आता अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले होते. याच मालिकेच्या सेटवर अंकिता लोखंडे (अर्चना) आणि दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे (वर्षा) यांची पहिली भेट झाली होती. प्रियाच्या आठवणीत अंकिताने भावुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
अंकिता लोखंडे दु:ख व्यक्त करत लिहिते, “पवित्रा रिश्ता’ मालिकेतील प्रिया माझी पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया…आम्हा तिघींची एकत्र गँग होती. आम्ही तिघी नेहमी एकत्र असायचो…खूप मजा करायचो. प्रिया, प्रॅट्स ( प्रार्थना ) आणि मी आम्ही तिघी एकमेकींना मराठीत प्रेमाने ‘वेडे’ म्हणायचो. ‘वेडे’ अशीच हाक मारायचो.
View this post on Instagram
ती माझ्याबरोबर माझ्या चांगल्या दिवसांमध्ये होती आणि दु:खातही प्रियाने माझी साथ कधीच सोडली नाही. जेव्हा-जेव्हा मला तिची गरज भासली त्या प्रत्येक क्षणाला प्रिया माझ्याबरोबर होती. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर ती नेहमी गौरीच्या आरतीला माझ्याकडे यायची…तिने आमच्या घरची आरती कधीही चुकवली नव्हती.
आता यावर्षी प्रिया मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन…माझी वेडे…खरंच खूप आठवण येतेय तुझी…”अंकिता शेवटी लिहिते, “प्रिया…माझी प्रिय वेडे…तू कायम माझ्या हृदयात राहशील, तुझी प्रत्येक आठवण कायम माझ्या मनात असेल. आपण पुन्हा भेटेपर्यंत… ओम शांती” असं अभिनेत्रीने म्हंटलं आहे.





