प्रिया मराठेच्या निधनाला एक महिना पूर्ण; शंतनू मोघेने शेअर केली भावनिक पोस्ट

Shantanu Moghe Post | लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. प्रियाच्या जाण्यानंतर तिचा पती अभिनेता शंतनू मोघेने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर त्याने प्रियाच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.
शंतनू मोघेनं इन्स्टाग्राम अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की, “ही कृतज्ञता व्यक्त करणारी एक अतिशय खास पोस्ट आहे. ज्यांनी ज्यांनी विविध संपर्क माध्यमांचा, जसं की कॉल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, X (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमातून, खास व्यक्ती अर्थात प्रिया मराठेबद्दल आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले, त्या सर्वांसाठी हे विशेष आभार! मी त्या सर्व कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींचा, चाहते आणि फॉलोअर्सचा, ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींचा खूप आभारी आहे, ज्यांनी इतक्या उदारपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.”
पुढे बोलताना शंतनू म्हणाला की, “आज एक महिना पूर्ण झाला. वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दांत मांडणं अशक्यच… माझ्या माहितीत असलेल्या इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि शुद्ध आत्म्याचा अनपेक्षित, अन्यायकारक आणि दुर्दैवी निरोप झाल्यामुळे आमचं हृदय आजही तुटतंय… पण तिनं असंख्य हृदयांना स्पर्श केलाय आणि तोही कसा… कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीनं, वागण्यातून, संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यांना जोडणाऱ्या तिच्या ‘कृती आणि सकारात्मक ऊर्जेनं!”
View this post on Instagram
“प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुम्हा सर्व लोकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुम्हा सर्वांसाठी प्रेम आणि शुभेच्छा! मनापासून कृतज्ञता. देवांना माझी चेतावणी: यापुढे तिची काळजी घेण्यात आणि तिच्यावर प्रेम करण्यात तुमच्याकडून एकही चूक झाली, तर ती माफ केली जाणार नाही… माझी परी (Angel)… पुन्हा भेटेपर्यंत खूप प्रेम. तुमचा ओलावा आणि प्रामाणिकपणा, दुःख आणि काळजी आमच्यापर्यंत कोणतीही शंका न ठेवता, 100% पोहोचली. तसेच, जगभरातून आलेल्या असंख्य आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. देव तुमचे भले करो…”, असं शंतनू मोघे म्हणाला आहे.
दरम्यान, प्रिया मराठे गेल्या काही काळापासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त होती. अखेर तिने अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. ती शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत पाहायला मिळाली होती.
हेही वाचा:
मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली; बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल





