Prithviraj Mohol : पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. तर महेंद्र गायकवाड हा उप महाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे.
अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात पार पडली. या स्पर्धेत गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षेचा पराभव केला तर माती विभागात महेंद्र गायकवाड यांनी परभणीच्या साकेत यादव याचा पराभव केला.
पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड
या स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. तर महेंद्र गायकवाड हा उपमहाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे.
शिवराज राक्षेच्या पराभवानंतर गोंधळाचे वातावरण
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला.
नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.





