Sikandar Shaikh Statement : ‘महेंद्र गायकवाडने फायनलमध्ये जो डाव टाकला, तो पूर्णपणे…’, हिंद केसरीच्या वादावर सिकंदर शेखची प्रतिक्रिया
Sikandar Shaikh Statement : महेंद्रने हा रडीचा डाव मुद्दाम टाकला, असा आरोप होत असतानाच आता महाराष्ट्राचा लाडका मल्ल सिकंदर शेखने यावर प्रतिक्रिया दिली.

Sikandar Shaikh Statement on Hind Kesari 2026 Controversy : साताऱ्यात पार पडलेल्या ५२ व्या ‘हिंद केसरी’ कुस्ती स्पर्धेतील महाअंतिम सामना आणि त्याभोवती निर्माण झालेला वाद सध्या महाराष्ट्रभर चर्चिला जात आहे. तब्बल २२ वर्षांनंतर साताऱ्याला या ऐतिहासिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. मात्र, अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यातील ३० मिनिटांची कुस्ती अवघ्या १८ सेकंदांत संपली. महेंद्रने पृथ्वीराजचा हात पिळल्याने त्याचा हात मोडला आणि मोठा वाद पेटला. महेंद्रने हा रडीचा डाव मुद्दाम टाकला, असा आरोप होत असतानाच आता महाराष्ट्राचा लाडका मल्ल सिकंदर शेख याने महेंद्र गायकवाडची उघड पाठराखण केली आहे.
“महेंद्रने टाकलेला डाव नियमानुसारच होता” – सिकंदर शेख
या वादावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख म्हणाला, “महेंद्र गायकवाडने अंतिम सामन्यात जो डाव टाकला, तो पूर्णपणे नियमात बसणारा आणि योग्य होता. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याचा हात पाठीवर घेणे हे नियमात चालते. हा हात पाठीवर घेऊन जर वरच्या बाजूला ओढला असता तर ते चुकीचे ठरले असते. मात्र, महेंद्रने हात बरोबर काटकोनात (राईट अँगल) पकडला होता. महेंद्र हा डाव यापूर्वीही अनेक मैदानांवर यशस्वीपणे टाकलेला आहे.” पृथ्वीराजने स्वतःचा हात वाचवण्याच्या नादात तो उभा केला आणि त्यामुळे ही दुखापत झाली; यात वाद करण्यासारखे काहीच नाही, असेही सिकंदरने स्पष्ट केले.
सिकंदर शेखला आला होता ‘वाईल्ड कार्ड’साठी फोन!
या संवादादरम्यान सिकंदर शेखने एक मोठा आणि खळबळजनक खुलासा केला. तो म्हणाला, “मी सध्या पूर्ण तयारीत आणि सरावात नसल्यामुळे या हिंद केसरी स्पर्धेत सहभागी झालो नव्हतो. मात्र, मला या स्पर्धेत थेट खेळण्यासाठी ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ दिली जात होती. त्या संदर्भात मला अधिकृत फोन देखील आला होता. परंतु, सराव नसल्याने मी स्वतःहूनच या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला.”
चुलत्यांचे स्वप्न केले पूर्ण – महेंद्र गायकवाड
या ऐतिहासिक विजयासह ५२ व्या हिंद केसरी गदेचा मानकरी ठरलेल्या महेंद्र गायकवाडला मानाची चांदीची गदा, रोख रक्कम आणि बक्षीस म्हणून ‘महिंद्रा थार’ गाडी देण्यात आली, तर उपविजेत्या पृथ्वीराज मोहोळला ट्रॅक्टर देण्यात आला. विजयानंतर भावूक होत महेंद्र म्हणाला, “मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तीन वेळा हरलो होतो, पण आज हिंद केसरीची गदा जिंकून माझे चुलते काकासाहेब गायकवाड यांचे स्वप्न मी पूर्ण केले आहे.”





