मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट; मध्यरात्री लोकसभेत प्रस्ताव मंजूर

मणिपूर : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झाले असून मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रात्री १ वाजून ५९ मिनिटांनी अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला.
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्या सोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता प्रकट केली होती. सीमावर्ती राज्याला छेद दिला आहे. प्रधानमंत्री तिथे कधी गेले नाहीत. आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो, असे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. त्यांनी काश्मीरमध्ये सुपीरिअर रिझल्ट्स दिले. पण, मणिपूरवर समाधान नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. मात्र, राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की मणिपूरमध्ये आपण शांतता प्रस्थापित कराल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
समुदायामध्ये जातीय हिंसा झाली. सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मणिपुरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही. मणिपूरमधील परिस्थिती समाधानकारक आहे, असे मी म्हणणार नाही, पण ती नियंत्रणात आहे. काँग्रेसकडे इतके खासदार नाहीत की ते अविश्वास प्रस्ताव मांडतील. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे, असे अमित शहा म्हणाले.





