sanjay raut : सिंहासन खाली करो, ठाकरे आए है.! संजय राऊतांचा मोदी-शहांना थेट इशारा

sanjay raut : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याने संपन्न झाला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. यानंतर सभागृह घोषणांनी दणाणून गेले. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करून मायमराठीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर दाखवून देऊ असा थेट इशारा दिला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीत मुद्दे मांडले. तसेच, यावेळी दोघांनीही आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आणि युती करण्याबाबत संकेत दिले.
मी राखणदार आहे !
“दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? “मला 100 टक्के खात्री आहे. तसं नसतं तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहे. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो” असं संजय राऊत म्हणाले.
भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला…
“राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकलं. संवाद पाहिजे राजकारणात. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला. तो संवाद कायम राहिला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
सिंहासन खाली करो, ठाकरे आए है !
“आता पुढे जे बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत. त्यांनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ! ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे , कोण राणे. हे मोदी शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील” असं संजय राऊत यांनी सांगितलं.





