मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी बुधवारी (9 जुलै) दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी गुप्त भेटी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमागील नेमकं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय आहे दिल्लीवारीमागील रहस्य? मुंबईतील विधिमंडळ अधिवेशनात महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय होत असताना शिंदे यांनी दिल्लीचा दौरा करणे आश्चर्यकारक मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी, विशेषतः गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेटी घेतल्या असाव्यात. या भेटींमध्ये महाराष्ट्रातील सत्तासमकरणे, मंत्रिमंडळ विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शिवसेनेच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या दौऱ्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिवेशनात गैरहजरी, सामंतांना जबाबदारी शिंदे यांनी अधिवेशनातील आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह इतर नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. शिंदे यांच्या अनुपस्थितीत सामंत यांनी अधिवेशनातील चर्चांमध्ये भाग घेतला. शिंदे यांच्या या अचानक निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत गतिशीलतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः, शिंदे यांच्या शिवसेनेला मंत्रिमंडळात आणि स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक वाटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीतील सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे महायुतीतील सहकारी पक्षांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या दौऱ्याबाबत माहिती होती की नाही, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापूर्वीही शिंदे यांनी अशा अचानक दिल्लीवाऱ्या करून राजकीय समीकरणे बदलली असल्याने, या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शिंदे यांचा हा दौरा वैयक्तिक नसून राजकीय आहे. यामागे काही मोठा डाव असू शकतो,” असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.