गुजरातचा जयजयकार..! शरद पवारांचा दाखला देत फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण

Eknath Shinde : महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात..’चा नारा देत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे बोलत होते.
नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे कौतुक करताना शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत भाषण संपवले. मात्र, अचानक त्यांना काही आठवले आणि पुन्हा माइकवर येत त्यांनी ‘जय गुजरात..’चा नारा दिला. या घोषणेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याला मी आठवण करुन देतो. यापूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब ‘जय महाराष्ट्र, जय कर्नाटक’ म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे, असं समजायचं का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो. त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटलं. याचा अर्थ एकनाथ शिंदेंचं गुजरातवर जास्त प्रेम आहे आणि मराठीवर कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचा हल्लाबोल
एकनाथ शिंदेंच्या या घोषणेवर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप…’ संजय राऊत यांनी सोशल मीडिया साइट ‘x’वरुन अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप आज बाहेर आलं आहे, असं म्हटलं आहे.
पुढे म्हणाले, पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ‘ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या… हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा थेट सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
एवढंच नाही तर ही पोस्ट करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे. सध्या राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क जय गुजरातची घोषणा केली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? पाहा…
या कार्यक्रमाला अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात बाजीराव पेशव्यांचा पराक्रम आणि अमित शाह यांचे नेतृत्व यांचे तोंडभरून कौतुक केले. पण भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने सर्वांचे लक्ष शिंदे यांच्याकडे वळले.





