Land Scam : शिंदेंच्या मंत्र्याने दिल्लीतल्या बॉसला खुश करण्यासाठी 10 हजार कोटी पाठवले, लेटर बाॅम्बने खळबळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी 20 हजार कोटी रुपये स्वत:च्या खिशात घातले, तर 10 हजार कोटी रुपये दिल्लीतील “बॉस”ला दिल्याचा गंभीर दावा राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांच अमित शहांना पत्र | Land Scam
रायगड जिल्ह्यातील 4,078 एकर वनजमीन, जी सरकारी ताब्यात होती, ती बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली. सिडकोच्या 12.5% जमीन वाटप योजनेअंतर्गत बिवलकर कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून अपात्र होते. तरीही, तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी त्यांना मनमानी पद्धतीने पात्र ठरवले. या व्यवहारासाठी शिंदे यांनी शिरसाट यांची केवळ 25 दिवसांसाठी सिडको अध्यक्षपदी नियुक्ती केली, आणि या कालावधीत घाईघाईने जमीन हस्तांतरण पूर्ण झाले.
20 हजार कोटींची लाच
राऊत यांनी आरोप केला आहे की, सिडको अधिकारी गरीब आणि वंचित प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपासाठी जागा नसल्याचा दावा करतात, परंतु बिवलकर कुटुंबाला 50 हजार कोटींची जमीन देताना कोणतीही अडचण आली नाही. या व्यवहारात 20 हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, 10 हजार कोटी रुपये दिल्लीतील “बॉस”ला दिल्याचे खुलेआम बोलले जाते, ज्यामध्ये थेट अमित शाह यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.
शिंदे-शिरसाटांना बडतर्फ करा, राऊत यांची मागणी
संजय राऊत यांनी पत्रात मागणी केली आहे की, एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि या घोटाळ्यात सहभागी सिडको अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. रायगडच्या प्रकल्पग्रस्तांच्या वतीने त्यांनी शिंदे आणि शिरसाट यांना मंत्रिमंडळातून त्वरित बडतर्फ करण्याची आणि 50 हजार कोटींच्या या घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.





