Pune District : कृषी विद्यान केंद्राच्या सभेत ‘एआय’चे सादरीकरण
Pune District : संतोष गोडसे यांनी विस्तार विषयातील उपक्रम सादरीकरण केले. तसेच केंद्राच्या सहकार्यातून सुरू केलेल्या उद्योगांबाबत शेतकऱ्यांची माहिती दिली.

बारामती : अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न झाली. यात भाजीपाला लागवड, तेलबियांचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त विष्णुपंत हिंगणे उपस्थित होते. दूरदर्शी प्रणालीमार्फत आयसीएआर अटारी पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. ससाणे, डॉ. मृणाल अजोतीकर, कांदा व लसूण संशोधन केंद्राचे डॉ. राजीव काळे, पुरंदर येथील अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय अजैविक तान संशोधन केंद्र माळेगावचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण, विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने व डॉ. भालेराव, मंडल कृषी अधिकारी डोंबाळे, आत्मा तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक विश्वजीत मगर प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या योजनांचा लाभ घेतलेले शेतकरी, उद्योजक विश्वजीत वाबळे, केंद्रप्रमुख डॉ. धीरज शिंदे व इतर सर्व कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष गोडसे यांनी प्रस्तावना करून उपस्थितांचे स्वागत केले केंद्रप्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी गेल्या वर्षीचे सूचना व त्यावर केलेले पूर्तता तसेच केंद्रामधील नवीन सुरू केलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. विवेक भाईटे यांनी मृदा शास्त्र विभागात केलेली प्रात्यक्षिके व त्यांचे आलेले रिझल्ट तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रात्यक्षिक याबाबत सादरीकरण केले.
यशवंत जगदाळे यांनी उद्यानविद्या विषयातील कलमी भाजीपाला लागवड करून मिळालेले फायदे व इतर उपक्रम सादर केले. संतोष करंजे यांनी तेलबिया प्रात्यक्षिके आणि कृषी विज्ञान केंद्राच्या फार्मवर केलेल्या उपक्रमांची सादरीकरण केले. डॉ. मिलिंद जोशी यांनी कीड व रोग शास्त्र विषयातील सादरीकरण केले. संतोष गोडसे यांनी विस्तार विषयातील उपक्रम सादरीकरण केले. तसेच केंद्राच्या सहकार्यातून सुरू केलेल्या उद्योगांबाबत शेतकऱ्यांची माहिती दिली.
त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील शिवरी गावातील कांचन सुखदेव लिंबोरे यांची डाळ मिल तसेच या वर्षी धान्य प्रक्रिया 200 टन केल्याचे सांगितले आणि आंबा आणि लिंबू चुंदा करार पद्धतीने करून त्याद्वारे सुमारे नऊ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत, असे सांगितले. स्वाती काकडे यांनी निंबूत येथील सुरू केलेल्या मसाला व लोणचे चटण्या उद्योगांबाबत माहिती दिली. उत्पादन सुरू करून विक्रीसाठी भीमथडी जत्रा कृषी प्रदर्शन येथून सुरुवात झाली व सध्या ऑनलाईन पद्धतीने देखील विक्री चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
वाळुंज येथील नितीन इंगळे यांनी प्रक्रिया उद्योगांबाबत माहिती दिली. त्यांनी जांभूळ 115 टन, आंबा 110 टन, पेरू 50 टन, अंजीर 10 टन, चिक्कू 20 टन, ब्रोकोली 6 टन यावर प्रक्रिया करून ग्रेट पुरंदर नावाने ब्रँड तयार केल्याचे सांगितले. या सर्वांमधून सहा कोटीची उलाढाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रीसाठी भीमथडी आणि कृषक सारख्या प्रदर्शनातून व्यापारी मिळाले त्यांनी सांगितले. दीपक जगताप राहणार नींबूत यांनी सात एकर अंजीर आणि स्ट्रॉबेरी मधून 55 लाखांची उलाढाल होत असल्याचे सांगितले. सर्व उपस्थित शास्त्रज्ञांनी काही सूचना केल्या. संतोष करंजे यांनी आभार मानले.





