अवसरी, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील अवसरी, काठापूर आणि कळंब परिसरात गेल्या तीन आठवड्यात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. साधारण ऊसाच्या किंवा पीक असलेल्या शेतांजवळच्या परिसरातील गोठ्यातील जनावरांना या बिबट्यांनी आपले लक्ष्य केले आहे. आपापल्या शेतातील पीक राखण्यासाठी शेतकरी जवळच घरे बांधून राहतात. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. बिबट्यांच्या मागील दोन आठवड्यातील हल्ल्यांच्या घटना पाहिल्यास घोडा, शेळ्या, गाई, बैल व कुत्रे, अशा पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहे. केंद्रीय वन खात्यांच्या माहितीनुसार बिबट्यांची संख्या ही वाघांच्या तुलनेत सुमारे आठ पटींनी जास्त आहे. त्या तुलनेत त्यांच्या राहण्याची ठिकाणे ही अपुरी आहेत. त्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण झाल्याने हे श्वापद आपले भक्ष्य शोधण्यासाठी जंगलाजवळच्या शेत किंवा मानवी वस्त्यांकडे वळतात. त्यांचे खाद्य हे साधारण पाळीव जनावरे आहेत. जंगलात असलेली अशी जनावरे आता त्या तुलनेत कमी झाली आहेत. त्यामुळे बिबट्यासारखे श्वापद हे शेती व मानवी वस्तीकडे आपले खाद्य शोधायला वळू लागले आहे. आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात अने पाळीव जनावरे, त्यातल्या त्यात कुत्री मोठ्या प्रमाणावर फस्त केली आहेत. या बिबट्यामुळे परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वनविभागाने या बिबट्यांवर नियंत्रण आणावे, त्यांनावेळी पकडण्यासाठी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्र्यांनी केली आहे. *१ जून : अवसरी येथील खालच्या शिंदे मळा येथील दीपक शिंदे यांच्या शेतात मेंढपाळ धुळा गोरे यांचा मेंढ्यांचा वाडा होता. १ जून रोजी शनिवारी पहाटे मेंढपाळ गोरे हे कुटुंबासह झोपले असताना बिबट्याने घोड्यावर हल्ला चढवीत घोड्याला मारून टाकले. घोड्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या. *६. जून : दोन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेला अवसरी येथील विझुरा वस्ती हा परिसर आहे. या परिसरात असणाऱ्या योगेश चव्हाण यांच्या गोडाऊन शेजारी असणाऱ्या शेतामध्ये जनार्दन चव्हाण (वय ६८) हे सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या शेळ्या चारत होते. त्या वेळी तिथे बिबट्याने शेळीवर हल्ला केला. पण चव्हाण यांनी मोठ्याने आरडाओरड करीत हातातील काठीने त्याला हुसकावल्याने त्याने तेथून पळ काढला. शेळीच्या मानेवर दोन ठिकाणी बिबट्याचे दात लागले आहेत. पण त्यांना आपल्या शेळीचा जीव वाचवता आला आहे. *७ जून : काठापूर येथे पहाटे दोनच्या सुमारास मेंढपाळ संतोष सोनर यांच्या तळावर बिबट्याने हल्ला करून घोडी ठार मारली आहे. * ९ जून : कळंब येथे गावठाणात श्रीकृष्ण दूध डेअरीच्या पाठीमागील वस्तीवर श्याम मच्छिंद्र शिंदे यांची गाभण शेळी बिबट्याने हल्ला करून ठार केली. *११ जून : शेतकरी राजेंद्र शिंदे आणि संजय शिंदे यांच्या निवास स्थानासमोर त्यांचा पाळीव कुत्रा होता. बिबट मादीने तो कुत्रा उचलून नेऊन त्याला ठार केले आहे. ही मादी परिसरात त्याच्या दोन बछड्यासह फिरत आहे. बिबट मादीने आतापर्यंत परिसरातील बरेचशी पाळीव कुत्री फस्त केलेली आहेत. बिबट्यांची संख्या जास्त केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०२२ पर्यंत देशात त्यांची संख्या ३६८२ एवढी आहे. मात्र, भारतात बिबट्यांची संख्या वाघांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. देशातल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबटे आढळून येतात. वाघांच्या तुलनेत भारतातील बिबट्यांची संख्या आठपटींनी जास्त आहे. म्हणजे देशात जवळजवळ पंचवीस हजार बिबटे असू शकतात. बिबट्यांचा अधिवास नष्ट झाल्याने, मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार झाल्याने आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बिबटे मानवी वस्तीत घुसतात आणि माणसांवर हल्ले करतात. बिबट्या हा एक अत्यंत चपळ प्राणी आहे. त्यामुळे तो मानवी वस्तीत शिरला तर प्रचंड धुमाकूळ घालू शकतो.