Sports In Pune : राज्य बुद्धिबळ स्पर्धेत ‘प्रथमेश शेरला’ ठरला विजेता…

पुणे – विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजाराम विष्णू आगरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ व्या एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरलाने सहा गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स येथे झालेल्या या स्पर्धेतील खुल्या गटात सातव्या फेरीअखेर प्रथमेश, केवल निर्गुण, विहान दौडा, अक्षज पाटील यांचे समान सहा गुण झाले होते. मात्र, टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने प्रथमेशने अव्वल क्रमांक पटकावला. केवल दुसऱ्या, विहान तिसऱ्या, तर अक्षज चौथ्या क्रमांकावर राहिला.
अलौकिक सिन्हा विजेता
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अलौकिक सिन्हाने सात फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. परम जलान (६) दुसऱ्या, तर राम लथिक (५.५) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. स्पर्धेतील दहा वर्षांखालील मुलांच्या गटात कविश लिमयेने सात फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयाची पारितोषिके करंडक पदके व प्रशस्तीपत्रक देण्यात आली स्पर्धेत १९० खेळाडूंनी भाग घेतला होता.
Khelo India Youth Games 2023 : बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत..
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हाणे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, श्रुती आगरकर यांच्या हस्ते पार पडला.





