Aamne Samne Natak : टाळी एका हाताने वाजत नाही.! ‘आमने-सामने’ नाटकाच्या वादात प्रशांत दामलेंची एन्ट्री; मांडली स्पष्ट भूमिका
'आमने-सामने' या नाटकातून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक काढून टाकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

Aamne Samne Natak : मराठी रंगभूमीवर सध्या ‘आमने-सामने’ या नाटकावरून सुरू असलेल्या वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. मानधनवाढीची मागणी, कलाकारांना अचानक नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप आणि निर्मात्यांकडून करण्यात आलेलं स्पष्टीकरण यामुळे हा वाद दिवसेंदिवस अधिकच चर्चेत आला.
अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली बाजू मांडल्यानंतर नाटकाचे निर्माते मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांनीही आरोपांना उत्तर दिलं. या प्रकरणावर मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या.
आता ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूमीवरील लोकप्रिय नाव प्रशांत दामले यांनीही या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘टाळी एका हाताने वाजत नाही’, असं म्हणत त्यांनी कलाकार आणि निर्माते या दोन्ही बाजू समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.
काय म्हणाले प्रशांत दामले?
प्रशांत दामले यांनी कलाकार आणि नाट्यनिर्माते यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. ते म्हणाले, “प्रत्येक नाट्यनिर्माता आणि त्याच्या नाटकातील कलाकार यांचे संबंध हे सौहार्दाचे असले पाहिजेत. संवादातून प्रश्न सुटू शकतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे याबाबतीत दोघांचंही म्हणणं जाणून घ्यायला हवं.”
पुढे त्यांनी रंगभूमीवरील कलाकारांच्या जबाबदारीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. “नाटकाचा प्रयोग सादर होताना कलाकारांची बांधिलकी ही शेवटी प्रेक्षकांशी असते. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम प्रयोगावर व्हायला नको, याची खबरदारी मात्र घेतली गेली पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.
नेमका काय आहे ‘आमने-सामने’चा वाद?
‘आमने-सामने’ या नाटकातून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक काढून टाकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे सांगितलं होतं. मानधनात वाढ करण्याची मागणी केल्यानंतर निर्मात्यांनी अचानक नाटकातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने आपण दुखावल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी काय सांगितलं?
रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या आरोपांनंतर नाटकाचे निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनीही आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कलाकारांकडून एका वर्षात तिसऱ्यांदा मानधनवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे नाटकाच्या आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, त्यानंतर रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी पुन्हा व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांचा दावा फेटाळला. आपण एका वर्षात नव्हे, तर आठ वर्षांच्या कालावधीत तिसऱ्यांदा मानधनवाढीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या दाव्यांमुळे या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली.






