Salman-Aishwarya : सलमान-ऐश्वर्याचा रोमँटिक फोटो शेअर करणं भन्साळींना पडलं महागात; करवा चौथच्या पोस्टवर नेटकरी भडकले
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटात सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Salman-Aishwarya : बॉलिवूडमध्ये काही प्रेमकहाण्या अशा असतात, ज्या काळाच्या ओघातही चाहत्यांच्या मनातून पुसल्या जात नाहीत. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणीही त्यापैकीच एक! एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अशी जादू निर्माण केली की, आजही त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा होते.
मात्र, आता या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या प्रयत्नात भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. करवा चौथच्या निमित्ताने सलमान आणि ऐश्वर्या यांचा रोमँटिक फोटो शेअर करत दोघांनाही टॅग करण्यात आलं. पण नेटकऱ्यांना ही गोष्ट काही रुचली नाही.
नेमकी काय आहे भन्साळी प्रोडक्शनची पोस्ट?
संजय लीला भन्साळी यांच्या ‘Bhansali Productions’ या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून करवा चौथच्या निमित्ताने ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक जुना फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये दोघेही चंद्राच्या पार्श्वभूमीवर दिसत असून, चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची आठवण करून देणारा हा क्षण आहे.
या फोटोसोबत प्रोडक्शन हाऊसने, “काही फोटो, काही आठवणी आणि प्रेमाची एक सुंदर कहाणी! हॅप्पी करवा चौथ!” असं कॅप्शन लिहिलं होतं. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांनाही टॅग करण्यात आलं होतं. त्यानंतर या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
नेटकरी संतापले.!
दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करणं आणि त्यांना एकत्र टॅग करणं अनेक नेटकऱ्यांना खटकलं. काही युजर्सनी प्रोडक्शन हाऊसच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. जुन्या वैयक्तिक नात्याची आठवण अशा पद्धतीने पुन्हा करून देण्याची गरज काय, असा सवालही काहींनी उपस्थित केला. काही नेटकऱ्यांनी या पोस्टला ‘शुद्ध वाईट’ असं संबोधत प्रोडक्शन हाऊसच्या भूमिकेवर टीका केली.
दुसरीकडे, अनेक चाहत्यांनी भन्साळी प्रोडक्शनच्या पोस्टचं समर्थन केलं आहे. त्यांच्या मते, हा फोटो सलमान आणि ऐश्वर्या यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहण्याऐवजी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील समीर आणि नंदिनी या लोकप्रिय पात्रांच्या आठवणी म्हणून पाहायला हवा.
‘हम दिल दे चुके सनम’मधील जोडी आजही चर्चेत
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटात सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
प्रेम, त्याग आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत यांचं सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आलं होतं. चित्रपटातील गाणी आणि विशेषतः सलमान-ऐश्वर्याची पडद्यावरील केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.








