#प्रभात वॉच : अतिउत्साहाचे उधाण आवरायला हवे ! पोलीस प्रशासनाची हातावर घडी; नागरिकांचा जीव धोक्यात

– विश्वास सुतार/प्रभात वृत्तसेवा
पुणे – अलीकडच्या काळात सार्वजनिक सेलिब्रेशनचे नवीनच फॅड तरुणाईत रुजत चालले आहे. जयंती, मोठ्ठे सण, महोत्सवात ताळतंत्र सोडून जल्लोष करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र, अशा आततायी वर्तनामुळे एखाद्याला इजा अथवा कोणी जायबंदी होऊ शकतो, हेही पाहिले पाहिजे. अशा प्रसंगी पोलीस प्रशासन हतबल होऊन फक्त बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे अशा प्रकारचे अतिउत्साही उधाण आवरायला हवे, अशा तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.
मंगळवारी ‘आरसीबी’ने १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि सगळी तरुणाई रस्त्यावर उतरल्याचे शहरात पाहावयास मिळाले. फर्गसन रस्त्यावरील कलाकार कट्टा चौकात तर अक्षरशः झुंबड उडाली होती. त्यातच एक समर्थक मोठ्या आकाराचे फटाक्यांचा बॉक्स हातात धरून आतषबाजी करत होता. तेही अगदी हजारोंच्या गर्दीत. आजूबाजूचे लोक आणि पोलीसही त्याला हटकत होते.
मात्र, त्या बेभान झालेल्या तरुणाला त्याची अजिबातच पर्वा नव्हती. तिथे कोणती दुर्घटना झाली नाही, इथंपर्यंत ठिक आहे, पण नको असे काही घडलेच असते, तर त्याची जबाबदारी कोणाची? खरंतर अशा सामूहिक उत्सवाच्या वेळी पोलिसांनी आधीच चार पावले पुढे येऊन काहीतरी ठोस भूमिका घ्यायला हवी. मात्र, बेभान झालेल्या गर्दीच्या विचित्र मानसिकतेचा रोष ओढवून घ्यायला नको, यासाठीच कदाचित त्यांच्या हाताची घडी सुटत नसावी.
खरंतर सण-जयंतीच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणे हे चुकीचे आहे, असे मुळीच नाही. मात्र, त्याला काहीतरी ताळतंत्र, मर्यादा निश्चितच हव्यात. गाडीच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करत रॅली काढणे, भर चौकात राडा करणे, अपरात्री डॉल्बीचा थर लावून धांगडधिंगा घालणे, मिरवणुकीत नशापाणी करून वाहतुकीचा सत्यानाश करणे, गर्दीतून वाढ काढत जाणाऱ्या वाहनचालकाला धक्काबुक्की करणे, वेळप्रसंगी शिव्या घालणे, रात्री- अपरात्री दाट वस्तीतून गाड्या रेस करत झुंडीने फिरणे अशा घटनांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येते. त्याची खदखद काही जण बोलून दाखवतात.
मात्र, ती तात्पुरतीच प्रतिक्रिया होऊन बसते. सण, उत्सव म्हणून लोक याकडे जरी वरवर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असले, तरी मनातून शासन, पोलीसांना लाखोली वाहत घराचा रस्ता धरतात. हे कुठेतरी थांबायला हवे. नाहीतर ऊतू जाणाऱ्या उत्साहातून अप्रिय घटना ओढवण्याची नामुष्की थांबवणे शक्य होणार नाही.





