Kakoli Ghosh Dastidar : तृणमूलला आणखी एक धक्का ! खासदार काकोली घोष दस्तीदार यांचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार (Kakoli Ghosh Dastidar) यांनी बुधवारी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला.

Kakoli Ghosh Dastidar : तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार (Kakoli Ghosh Dastidar) यांनी बुधवारी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या दस्तीदार (Kakoli Ghosh Dastidar) यांनी अखेर हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असले, तरी त्या खासदार पदावर कायम राहणार आहेत.
पक्षाकडे सुपूर्द केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत मानसिक संघर्ष आणि दीर्घ विचारमंथनानंतर मी हा निर्णय घेत आहे. अखिल भारतीय तृणमूल महिला काँग्रेसचे अध्यक्षपद आणि पक्षाच्या इतर संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा मी त्याग करत आहे.
अशा पदावर राहणे आता माझ्यासाठी योग्य नाही, जिथे एक महिला खासदार असूनही मी पक्षाच्याच एका अशिक्षित आणि असभ्य खासदाराच्या अभद्र वर्तनाला रोखू शकले नाही; तसेच या प्रकरणात मला ज्येष्ठ नेतृत्वाचे सहकार्य किंवा सहानुभूतीही मिळाली नाही.
असे नमूद करत आपल्या पत्रात दस्तीदार (Kakoli Ghosh Dastidar) यांनी राज्यातील विविध घोटाळ्यांचा आणि गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत पक्षाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या दशकभरात पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आलेल्या रेशन घोटाळा आणि शिक्षक भरती घोटाळ्यामुळे जनतेच्या मनात पक्षाप्रती तीव्र संताप आणि अविश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूची घटना आणि ती दाबण्याचा झालेला प्रयत्न यामुळे संपूर्ण समाज हादरला असून आपली सदसद्विवेकबुद्धीही विचलित झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर बाहेरील संस्थांचा प्रभाव वाढत असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. निवडणूक रणनीती आखणाऱ्या आयपॅक संस्थेशी संबंधित व्यक्ती आणि गटांकडून होत असलेल्या अलोकतांत्रिक हस्तक्षेपामुळे आपण त्रस्त झालो आहोत, असे सांगत अशा पारदर्शकता नसलेल्या पद्धतींमुळे पक्षाची विचारसरणी आणि परंपरा धोक्यात येत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.काकोली घोष दस्तीदार यांच्या या बंडखोरीमुळे आणि गंभीर आरोपांमुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस बॅकफूटवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






