Polio Campaign: २ लाख ८५ हजार बालकांना डोस
Polio Campaign:

पुण्यात पोलिओ मोहिमेत ९०.२ टक्के लसीकरण
Polio Campaign: २ लाख ८५ हजार बालकांना डोस पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात रविवारी (दि. २२) राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.
निर्धारित उद्दिष्टाच्या ९०.२ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, वंचित राहिलेल्या बालकांना उद्यापासून (दि. २३) घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.
शहरात पाच वर्षांखालील ३ लाख १६ हजार २७५ बालकांना डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या मोहिमेसाठी महापालिकेने चार लाख पोलिओ लसींचा साठा, तसेच १ हजार ३६७ लसीकरण बूथ उभारले होते.
सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. समाविष्ट गावांतील बालकांना त्यांच्या पूर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत डोस देण्यात आले. प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी ट्रान्झिट टीम आणि नियमित बूथवर पोहोचू न शकणाऱ्या बालकांसाठी विशेष व्यवस्था केली होती.
आरोग्य विभागाकडून सोमवारपासून अद्यापही पोलिओ डोस न घेतलेल्या बालकांचे घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब द्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.





