Police Suspension : विषारी दारू प्रकरणी पोलिसांवर कारवाई! वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित
Police Suspension : फुगेवाडी-दापोडी विषारी दारू प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहा जण निलंबित.

Police Suspension – फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय कारवाई हाती घेतली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि संबंधित हालचालींकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पोलीस हवालदार जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे तसेच पोलीस शिपाई सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे.
हे सर्व कर्मचारी दापोडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. फुगेवाडी परिसरात संशयित विषारी दारू प्रकरणानंतर एकामागोमाग एक मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अवैध दारू विक्री आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाने अंतर्गत पडताळणी सुरू केली होती.
दरम्यान, विषारी दारू प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण, संबंधित पुरावे आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका याबाबत विविध यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जात आहे. विभागीय चौकशी अहवालानंतर या प्रकरणात आणखी काही प्रशासकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





