Police Suspended: भांडण सोडवणं पडलं महाग! बेदम मारहाण करणारा पोलीस निलंबित…नेमकं प्रकरण काय?
Police Suspended: करमाळा एसटी बसस्थानकाजवळ घडला प्रकार; मध्यस्थी करायला गेलेले शुभम भोसले गंभीर जखमी, ४१ दिवसांच्या उपचारानंतर नोंदवला जबाब.

Police Suspended – मध्यस्थी करणाऱ्याला चालकाला बेदम मारहाण केल्याने एका पोलिसांला अटक केली आहे. तसेच पुणे पोलिसांनी त्याला निलंबित केले आहे. अमित सुरेश जाधव ( ४२, रा. भवानी पेठ) असे पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शुभम चंद्रकांत भोसले ( २७, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशोभनीय वर्तनाबद्दल पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी जाधवला निलंबीत केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम भोसले हे चालक असून ३१ मे रोजी इर्टिगामधून अमित जाधव यांच्यासह त्यांची पत्नी, आई, बहिण आणि दोन मुलांना घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. विविध ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते करमाळा एसटी बसस्थानकाजवळ चहा-नाश्त्यासाठी थांबले असता जाधव अचानक चिडले. पत्नी, आई व बहिणीला शिवीगाळ केली.
पत्नीला मारहाण करताना शुभम भोसले आणि मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. जाधव यांनी त्यांनाच काठीने मारहाण केली. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. भोसले यांना करमाळा येथे उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुण्यातील रुग्णालयात हलविले. तब्बल ४१ दिवसांच्या उपचारानंतर ११ जुलै रोजी त्यांना डिस्चार्ज दिला.
त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना कर्वेनगर येथील न्यूरो केअर सेंटरमध्ये दाखल केले.उपचारादरम्यान भोसले हळूहळू शुद्धीवर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब नोंदविला. हा जबाब करमाळा पोलीस ठाण्याकडे पाठविला. त्यानुसार त्यांनी २१ ऑगस्ट रोजी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली.





