Goat Theft Arrest: लक्झरी कारने फिरायचा अन् शेळ्या चोरायचा! शिक्रापूर पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
Goat Theft Arrest: स्थानिक गुन्हे शाखेची तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात धडक कारवाई; भोईटी उर्फ कृष्णा काळेला अटक.

Goat Theft Arrest – शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोईटी उर्फ कृष्णा कांतीलाल काळे (वय २५) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे व शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तपासात पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, पोलिसांना संबंधित आरोपी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ त्या परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. भोईटी ऊर्फ कृष्णा काळे तो सध्या नवलाख उंबरे (ता. खेड) येथे राहत असून मूळचा डिगी काळेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने वरील तीन शेळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.
गुन्ह्यात कार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केली आहे. आरोपी तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी रिपोर्टसह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस अंमलदार सागर धुमाळ यांनी केली.





