Koregaon News: कोरेगाव आगारावर विभागीय प्रशासनाचा अन्याय? ‘राजमाता जिजाऊ’ बसची अजूनही प्रतीक्षा
Koregaon News: जिल्ह्यातील इतर आगारांना अत्याधुनिक 'राजमाता जिजाऊ' बसेस; कोरेगाव आगाराला मात्र जुन्याच गाड्यांचा पुरवठा.

Koregaon News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात तीन हजार अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत असताना सातारा जिल्ह्यातील काही आगारांमध्ये नव्या बसेस दाखल झाल्या असल्या तरी कोरेगाव आगाराला मात्र अद्याप या बसेसची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कोरेगाव आगाराला प्रत्यक्षात नवीन बस कधी मिळणार, याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
राजमाता जिजाऊ बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि स्मार्ट प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कोरेगाव आगाराच्या बाबतीत नवीन बसेसच्या वाटपात पुन्हा एकदा दुजाभाव होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. यापूर्वीही कोरेगाव आगाराला नवीन बसेस सर्वात शेवटी देण्यात आल्याचा अनुभव आहे.
त्या वेळीही नवीन बसेस एकाच वेळी न देता प्रत्येकी पाच अशा दोन टप्प्यात आगाराला देण्यात आल्या होत्या. एकीकडे जिल्ह्यातील इतर आगारांना नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मिळत असताना दुसरीकडे इतर आगारांमधील जुन्या बसेस कोरेगाव आगाराकडे पाठविण्याचा सपाटा विभागीय स्तरावर सुरू असल्याची परिस्थिती आहे.
ग्रामीण प्रवासी सेवेला फटका
कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि शासकीय कामांसाठी एसटीवर अवलंबून आहेत. जुन्या बसेस वाढत असताना नवीन बसेसची प्रतीक्षा कायम राहिल्यास ग्रामीण भागातील प्रवासी सेवा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक आणि सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न करत असताना कोरेगाव आगाराला या सुविधेपासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.





