Pune Crime: श्रावणात मांसाहार बेतला जीवावर! वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू…नक्की काय घडलं?
Pune Crime: रामनगर परिसरातील धक्कादायक प्रकार; डॉक्टरांनी उपचारापूर्वीच घोषित केले मृत, वारजे पोलिसांकडून आई-वडिलांना अटक.

Pune Crime – मटण करून देण्याचा हट्ट धरल्याने दारूच्या नशेत असलेल्या मुलाचा वडिलांशी वाद झाला. त्याचे पर्यावसान मारहाणीत होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथे घडला. महेश भागवत गायकवाड (वय ४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते. दहा वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. मात्र, व्यसन आणि कामधंदा नसल्याने त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर महेश एकटाच राहात होता. जेवणासाठी तो आई- वडिलांकडे जात असे. दारू पिऊन घरी येणे आणि मांसाहारी जेवणाची मागणी करण्यावरून त्याचे वडिलांशी वारंवार वाद होत होते.
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला व त्याने मटणाचे कालवण करून देण्याची मागणी केली. मात्र, श्रावण सुरू असल्याने घरात मांसाहार बनवत नसल्याचे आई-वडिलांनी सांगितले. तरीही महेशने हट्ट धरल्याने वाद वाढून वडील भागवत यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याने महेशचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
पहाटे प्रकार उघड
रात्री महेश आणि वडिलांमध्ये भांडण सुरू असल्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या त्याचा भाऊ गणेशला (वय ३४) आला होता. यापूर्वीही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने गणेशने त्याकडे दुर्लक्ष केली. पहाटे साडेचारच्या सुमारास आईने गणेशला महेश उठत नसून त्याचे शरीर थंड पडल्याचे सांगितले. गणेशने त्याच्या डोक्याखाली हात घातला असता त्याच्या हाताला रक्त लागले.
नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर महेशला ससून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, महेशच्या मृत्यूनंतर प्रकार लपविण्यासाठी आईने वडिलांना मदत केल्याचा आरोप गणेशने केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी माहिती दिली.






