Pune District : अनधिकृत पार्किंगला पोलिसांचा चाप; नारायणगाव बसस्थानक आवारात पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई
Pune District : या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने १५ जून २०२६ रोजी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.

नारायणगाव : नारायणगाव बसस्थानक आवारात अनेक दिवसांपासून खासगी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे वाहने पार्क करून ठेवली जात होती. त्यामुळे एसटी बस चालक व वाहकांना बस प्लॅटफॉर्मला लावणे तसेच बसची ये-जा करणे अडचणीचे ठरत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत २६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, आगार प्रमुख वसंत अरगडे आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक तुकाराम पोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस काळुराम मासाळकर, मंगेश लोखंडे, राम भालसिंगे व त्रिशरण सोनवणे यांनी ही कारवाई केली.
बसस्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे एसटी चालक व वाहकांना वाहनांची हालचाल करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एखादी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी भीती चालक-वाहकांमध्ये निर्माण झाली होती.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने १५ जून २०२६ रोजी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र आगार प्रमुखांना देण्यात आले आहे. तसेच दैनिक प्रभातनेही सातत्याने एसटी चालक, वाहक, प्रवासी, बसस्थानक अधिकारी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू मांडत हा प्रश्न लावून धरला असून सर्वसामान्य प्रवाशांना न्याय मिळावा आणि बसस्थानक परिसर सुरक्षित व्हावा, यासाठी वृत्तपत्राने सातत्याने पाठपुरावा केला.
अधिकाऱ्यांसह ‘प्रभात’चेही कौतुक
बसस्थानकातील अनधिकृत पार्किंगचा प्रश्न सातत्याने मांडून प्रवासी, एसटी चालक आणि वाहकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पोलीस प्रशासन, एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच दैनिक प्रभातच्या भूमिकेचे विविध कामगार संघटनांनी कौतुक केले. बसस्थानक परिसरातील शिस्त कायम राखण्यासाठी अशी दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.





