Pune District : वाहतूक कोंडी व विकासकामांचा पीएमआरडीए आयुक्तांकडून प्रत्यक्ष आढावा ;आमदार माऊली आबा कटके यांचा पुढाकार
Pune District : तांत्रिक बाबींचा अभ्यास करून प्राधान्यक्रमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वाघोली : शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची गरज आणि विविध प्रलंबित विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आमदार माऊली कटके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१) व्यापक पाहणी दौरा पार पडला.
या दौऱ्यात आव्हाळवाडी, वाडेबोलाई, मांजरी खुर्द, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, लोणीकंद, भावडी, लोहगाव रस्ता, वाघेश्वर मंदिर परिसर, तुळापूर व बकोरी मार्ग या परिसरांना भेट देऊन वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यांची स्थिती, भविष्यातील वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार कटके यांनी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या समस्या पीएमआरडीए आयुक्तांसमोर मांडल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक रस्ते रुंदीकरण, पर्यायी मार्ग, पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रलंबित विकासकामांना प्राधान्याने गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
आयुक्तांनी विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती घेतली. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून प्राधान्यक्रमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिरूर-हवेली मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत करणे आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कायमस्वरूपी दूर करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी यावेळी सांगितले.
पूर्व हवेली मधील वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यांची स्थिती, भविष्यातील वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा आमदार माऊली कटके, पीएमआरडीए आयुक्तांच्या भेटीत घेण्यात आला. वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी हा दौरा मोलाची मदत ठरणार आहे.
प्रमोद हरगुडे माजी सरपंच, केसनंद





