PMPML Bus : कोट्यवधींचा खर्च करूनही प्रवाशी ताटकळत! ६ बीआरटी मार्ग असूनही अपुऱ्या बसेसमुळे पीएमपीचा बोजवारा
PMPML Bus : निगडी ते दापोडीसह सहा प्रमुख मार्गांवरील अद्ययावत बसथांबे ठरताहेत शोभेच्या वस्तू; खासगी ठेकेदारांच्या गाड्या रस्त्यातच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीत भर.

PMPML Bus – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात गतिमान प्रवासासाठी बीआरटी मार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, या विशेष मार्गिकांवर चालवण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पुरेशा बसेसच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. खर्चाच्या तुलनेत शहराला अत्यंत कमी बस पुरविल्या जात असल्याने बीआरटी यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे, प्रवाशांना एका बससाठी ३०- ४५ मिनिटे ताटकळत उभा रहावे लागत आहे, बस वेळापत्रकाचे सुनियोजन करुन वारंवा.िरता वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली.
केंद्राच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या नियमानुसार १ लाख लोकसंख्येमागे ६० बस असणे आवश्यक आहे. मात्र ३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उद्योगनगरीत मात्र चित्र उलटे दिसत आहे, पिंपरी-चिंचवड शहरात ६० किलोमीटर बीआरटी मार्गाचे जाळे असून, रोज २ ते २.५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, पुणे आणि पिंपरी या दोन्ही शहरांत बस वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
पिंपरी-चिंचवडच्या वाट्याला आलेल्या बहुतांश बसेस जुन्या, नादुरुस्त किंवा वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या आहेत. याशिवाय, प्रवाशांना तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून वारंवार वादाची परिस्थिती निर्माण होते. बसमधील गर्दीत कंडक्टरकडे पुरेसे सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून, या क्षुल्लक कारणावरून अनेकदा वाद होत असल्याचे चित्र आहे. काहीवेळा ऑनलाइन चालत नसल्याचेही वाहकाकडून सांगितले जाते. यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीकेची झोड उठत आहे.
कोट्यवधींचा खर्च निष्फळ
शहरातील वाहतूक कोंडी सुटावी आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी म्हणून निगडी ते दापोडी, निगडी ते किवळे, सांगवी ते किवळे, काळेवाडी ते चिखली, दीघी ते चर्होली तसेच भोसरी-हिंजवडी आणि वाकड हे सहा बीआरटी मार्ग शहरात आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटीचे जाळे आणि अद्ययावत बसथांबे उभारण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याने हा खर्च निष्फळ ठरत आहे
प्रवाशांचे हाल
बसच्या कमतरतेमुळे दोन गाड्यांमधील वेळ वाढली आहे. अनेक मार्गांवर प्रवाशांना ३० ते ४५ मिनिटे बसची प्रतीक्षा करावी लागते. उशिराने येणाऱ्या मोजक्या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबले जातात. उकाड्यामुळे नोकरदार, महिला आणि विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड हाल होतात. बीआरटी मार्गावर धावणाऱ्या खासगी ठेकेदारांच्या आणि पीएमपीच्या साध्या गाड्यांचे रस्त्यातच बंद पडण्याचे (ब्रेकडाऊन) प्रमाण वाढले आहे. यामुळे बीआरटी मार्गिकांमध्येच वाहतूक कोंडी निर्माण होते. वाढत्या उन्हाळ्यातही अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांना एसी बसेसचा लाभ घेता येत नाही.






