Pune News – स्वारगेट ते कात्रजदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे शहरातील सुमारे सहा किलोमीटरचा अखेरचा बीआरटी मार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहे. २००६ मध्ये देशात सर्वप्रथम पुण्यात सुरू करण्यात आलेल्या बीआरटी प्रयोगाची अखेर आता निश्चित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील जलद बस वाहतुकीसाठी बोगोटा शहराच्या धर्तीवर बीआरटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज हा पहिला डेडीकेटेड लेन असलेला बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला. रस्त्याच्या मध्यभागी बंदिस्त मार्गिका, स्वतंत्र बसथांबे आणि दोन्ही बाजूंनी दरवाजे उघडणाऱ्या बसांची सुविधेसह, हा मार्ग सुरू झाल्यानंतर त्यावर झालेल्या ५० हून अधिक जीवघेण्या अपघातांमुळे हा प्रकल्प चर्चेत आला होता. या मार्गानंतर सोलापूर रस्ता, नगर रस्ता, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातही टप्प्याटप्प्याने बीआरटी मार्ग विकसित करण्यात आले. हडपसर, मगरपट्टा, येरवडा, खराडी, संगमवाडी, विश्रांतवाडी, सांगवी फाटा, रावेत, नाशिक फाटा, वाकड, निगडी, दापोडी आणि काळेवाडीपर्यंत बीआरटी रस्ते उभारले होते. मात्र, बीआरटी मार्गांवर इतर वाहनांची घुसखोरी, वाढते अपघात, मार्गिकेबाहेरील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, तसेच बसथांबे आणि यंत्रणांमधील बिघाड यामुळे या प्रकल्पाला अल्पावधीतच घरघर लागली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक बीआरटी मार्ग बंद करण्यात आले. हडपसर रस्त्यावरील सेवा बंद झाली. संगमवाडी ते बिंदुमाधव चौक मार्गिका हटविण्यात आली. येरवडा ते विमाननगर चौकादरम्यानचा बीआरटी मार्गही काढण्यात आला. काही ठिकाणी संरचना अस्तित्वात असली, तरी बीआरटी सेवा थांबली आहे. या सर्वांमध्ये स्वारगेट ते कात्रज हा एकमेव आणि सर्वात जुना बीआरटी मार्ग अद्याप सुरू होता. मात्र, भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी सातारा रस्त्यावर विविध ठिकाणी काम सुरू झाल्याने हा मार्गही टप्प्याटप्प्याने बंद होत आहे. या ठिकाणी सुरू आहे काम अरण्येश्वर कॉर्नर ते पद्मावती कॉर्नरदरम्यानचा बीआरटी मार्ग मेट्रो स्थानकांच्या कामासाठी हटविण्यात आला आहे. यापूर्वी जेधे चौक ते व्होल्गा चौकदरम्यानचा भाग उड्डाण पुलाच्या कामामुळे बंद करण्यात आला होता. सध्या काही भागात बीआरटी बस सेवा सुरू असली, तरी मेट्रोचे काम पुढे सरकल्यानंतर हा मार्गही इतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे.