पुणे | पीएमपी पर्यटन बससेवा सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळकडून (पीएमपी) दि. १ मे पासून पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे, पर्यटकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरी येथील श्री खंडोबा, अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर मोरगांव, चिंतामणी थेऊर, महागणपती रांजणगांव यासह, वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीमंदिर, आळंदी, सिंहगड, देहू, मोरया गोसावी मंदिर, खारावडे म्हसोबा देवस्था, टेमघर, वरसगाव, खडकवासल धरणे, इस्काॅन मंदिर, प्रतिशिर्डी यासह विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पीएमपीएने पर्यटन बससेवा सुरू केली आहे.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा असणार आहे. सर्व बस वातानुकुलित ईलेक्ट्रीक असणार आहेत. ग्रुपने बुकिंग असल्यास पीएमपीकडून बस उपलब्ध करून देण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत मिळेल. डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवनयाठिकाणी तिकिट बुकींग होईल. प्रवाशांना माहिती देण्याकरीता प्रत्येक बसमध्ये गाइड सेवक असेल.
सात टप्यात पर्यटन बससेवा…
पहिला मार्ग : हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.
दुसरा मार्ग : हडपसर, सासवड , नारायणपूर, केतकवळे), बनेश्वर, कोंढणपूर, हडपसर
तिसरा मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.
चौथा मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन
पाचवा मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.
सहावा मार्ग : पुणे स्टेशन, वाघोली, वाडेबोल्हाई, वढू बुद्रुक, रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन
सातवा मार्ग : भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, रावेत, मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी





