Mangal Prabhat Lodha : हिंदू धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाबाहेर ठेवावीत; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : हिंदू धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणा बाहेर ठेवावीत ही माझी वैयक्तिक मागणी आहे. कारण धार्मिक स्थळे सरकारी खर्चाने बांधलेली नाहीत. काही भाविकांनी या स्थळासाठी जमीन दान केली, काहींनी आर्थिक मदत, तर काहींनी बांधकामासाठी मदत केली, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांसाठी समान कायदे असावेत. मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्यांना ज्या पद्धतीने पगार दिला जातो तसाच पगार मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही द्यावा का? या प्रश्नावर लोढा यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, 1980 मध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला मंगळवारी विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. या अध्यादेशावर सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंदू धार्मिक स्थळांप्रमाणेच अन्य धर्मांची धार्मिक स्थळेही सरकारच्या नियंत्रणामध्ये घेण्याची कल्पना व्यक्त केली होती. त्या संदर्भाने लोढा यांनी ही भूमिका व्यक्त केली.





