पीएमपी बस धावणार भीमाशंकर कारखान्यापर्यंत

मंचर – भोसरी-मंचर मार्गे-पारगांव भीमाशंकर साखर कारखाना मार्गावर लवकरच पीएमपीएमएल बससेवा सुरु केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातून अनेक सुशिक्षित तरुण प्रवासी नोकरी, उद्योग व्यवसायासाठी खेड, चाकण, म्हाळुंगे, तळेगाव, मोशी, भोसरी, पुणे आदी ठिकाणी दररोज खाजगी अथवा मिळेल त्या वाहनाने ये-जा करत आहेत.
अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्र निकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. विद्यार्थी खासगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घेत आहे. भोसरी ते अवसरी मार्गे भीमाशंकर कारखाना पारगाव या मार्गावर पीएमपीएल बस चालू होण्याकरिता अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक,
मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, टाव्हरेवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती उपसभापती संतोष भोर, कारखाना, कॉलेजने पुणे पीएमपीएलचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्याकडे अमित कांताराम हिंगे पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, संतोष वळसे पाटील, प्रताप हिंगे पाटील यांनी पत्र दिले.
भोसरी ते अवसरी मार्गे भीमाशंकर साखर कारखाना बस चालू करण्याकरिता सर्वे झाला आहे. लवकरच भोसरी ते भीमाशंकर साखर कारखाना पीएमपीएमएल बस सुरू करण्यात येईल. ही भोसरी येथून मंचर, अवसरी शासकीय कॉलेज मार्गे तर काही बस अवसरी फाटा, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, निरगुडसर मार्गे पारगांव भीमाशंकर साखर कारखाना असा सर्व्हे केला आहे.
-दत्तात्रय झेंडे, व्यवस्थापक पीएमपीएमएल





