PMC Seva Wari: महापालिकेची ‘सेवावारी’! यंदाच्या पालखी सोहळ्यात पुणेकर होणार ‘या’ मोठ्या उपक्रमाचे साक्षीदार
PMC Seva Wari: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महापालिकेचा 'सेवावारी' उपक्रम; आरोग्य, स्वच्छता आणि जनसहभागावर विशेष भर.

PMC Seva Wari – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने यावर्षी सेवावारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वारकर्यांची सेवा, स्वच्छता, आरोग्य आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला आहे. माझं शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेतून राबवण्यात येणार्या या उपक्रमात नागरिक, स्वयंसेवी संस्था,
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळांचा सहभाग वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालखी स्वागतासाठी चौकाचौकांत डीजे आणि मोठे ध्वनिक्षेपक टाळून टाळ-मृदुंगाच्या पारंपरिक वातावरणात वारकर्यांचे स्वागत करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. पालखी सोहळ्याच्या महापालिकेच्या तयारीची माहिती महापौर नागपुरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधीपक्षनेते अॅड.निलेश निकम उपस्थित होते. या उपक्रमाची सांगता १० जुलैला रात्री नऊ वाजता सामूहिक पसायदान पठणाने होणार असून पुणेकरांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही नागपुरे यांनी नमूद केले.
महापालिकेकडून तयारी…
पालखी मार्गावर सुमारे दोन हजार स्वच्छतागृहे, सहा जर्मन हँगर, १९५ मंडप, ४० आरोग्य पथके, ४० वैद्यकीय कक्ष, २० महापालिकेच्या व २२ स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिका, १८० फिजिओथेरपिस्ट, १०० वैद्यकीय विद्यार्थी, ४०० वैद्यकीय किट्स, पशुवैद्यकीय सेवा, डॉग स्क्वॉड, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कलावारी उपक्रम…
सेवावारी अंतर्गत कलावारी हा उपक्रमही प्रथमच राबवण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातील सर्व शाळांतील पाचवी ते दहावीच्या सुमारे चार लाख ३६ हजार विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय सर्वांसाठी खुली छायाचित्र स्पर्धा आणि शून्य ते १६ वर्षे वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धांचे परीक्षण संबंधित शाळांमार्फत केले जाणार आहे.
डीजे टाळा : महापौरांचे आवाहन
पालखी मार्गावर स्वागतासाठी डीजे व मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा वापर टाळावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. मोठ्या आवाजामुळे वारकर्यांच्या टाळ-मृदुंग, अभंग आणि नामस्मरणात व्यत्यय येतो. तसेच, दिंडी प्रमुखांच्या सूचना वारकर्यांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेकदा दिंडीत गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे पालखीचे स्वागत पारंपरिक टाळ-मृदुंगाच्या वातावरणातच करावे, अशी विनंती त्यांनी नागरिक व मंडळांना केली आहे.






