Mayor Manjusha Nagpure : वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ऑनलाइन नियंत्रण प्रणाली विकसित करण्याबरोबरच मल्टी-लेव्हल पार्किंग प्रकल्पांना गती देण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला सोमवरी दिले. नागरिकांना अधिक सोयीस्कर पार्किंग सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) प्रजीत नायर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची संख्या, चालकांची उपलब्धता तसेच ओला, सुका कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला. महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना राबवून प्रभावी बजेट नियोजन करण्याचे निर्देशही दिले. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने जुन्या इमारतींचा पुनर्विकास, नवीन इमारती उभारणी तसेच विविध प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून नियोजन करण्यावर चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या आढाव्यात मेडिकल कॉलेजमधील सुविधा उन्नतीकरण, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच पीपीपी तत्त्वावर हॉस्पिटल प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पेट स्कॅनसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या सूचना केल्या.