PMC Scholarship: १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ; पाहा नवीन तारीख

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनांच्या अर्जांना मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना (इ. १० वी) आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना (इ. १२ वी) अंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य दिले जाते.
आचारसंहिता लागू झाल्याने अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजने सोबतच दिव्यांग कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना, महिला व बाल कल्याण योजना तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २०२४ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी किंवा इ. १२ वी मध्ये किमान ८० टक्के गुण आवश्यक आहेत.
मात्र, महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी, रात्रशाळेतील विद्यार्थी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किमान ७० टक्के गुणांची अट आहे. ४० टक्के दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी तसेच कचरावेचक, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे व कचऱ्याशी संबंधित असंघटित कष्टकरी कामगारांची मुले यांच्यासाठी किमान ६५ टक्के गुण आवश्यक आहेत.
आतापर्यंत ९ हजार अर्ज…
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहेत. आतापर्यंत या दोन्ही योजनांसाठी एकूण ९ हजार ३५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये इ. १० वी योजनेसाठी ७ हजार ८६, तर इ. १२ वी योजनेसाठी २ हजार २७२ अर्जांचा समावेश आहे. त्यामुळे, ज्या मुलांचे अर्ज अर्धवट आहेत त्यांनाही आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ मिळणार आहे.





