PMC Reward Scheme: एक फोटो अन् ५ हजारांची कमाई! महापालिकेच्या स्थायी समितीत ‘हा’ भन्नाट प्रस्ताव मंजूर
PMC Reward Scheme: सूरज लोखंडे, गौरव घुले आणि दीपाली डोख यांचा पुढाकार; शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांनी निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव.

PMC Reward Scheme – पुणे शहरात विनापरवाना राडारोडा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समितीत ठरावाद्वारे करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्या वाहनमालकाला प्रत्येक खेपेस किमान १० हजार रुपयांचा दंड ठोठावावा, तसेच बेकायदा राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनाची पुराव्यासह माहिती देणाऱ्या नागरिकाला ५ हजार रुपयांचे बक्षीस द्यावे,
अशी शिफारस या ठरावात करण्यात आली आहे. सूरज लोखंडे, गौरव घुले आणि नगरसेविका दीपाली डोख यांनी हा प्रस्ताव दिला असून, तो प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. शहराचा विस्तार वेगाने होत असताना अनधिकृत कचरा आणि राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. रात्रीच्या वेळी मोकळ्या जागा,
रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदा राडारोडा टाकला जात असल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असून, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी बक्षीस योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाला बेकायदा राडारोडा टाकणाऱ्या वाहनाची छायाचित्रे, वाहन क्रमांक किंवा अन्य पुराव्यांसह माहिती देणाऱ्या नागरिकाला प्रतिवाहन ५ हजार रुपये बक्षीस देण्यात यावे. या योजनेसाठी महापालिका आयुक्तांनी वर्गीकरणाद्वारे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात या ठरावात करण्यात आली आहे.




