Varandha Ghat: वरंधा घाटात पुन्हा मोठा अनर्थ घडण्याची भीती; दरडींचा राडारोडा प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा
Varandha Ghat: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात हिर्डोशी ते उंबर्डे दरम्यान रस्त्याच्या कडेला साचले मातीचे मोठे ढिगारे; प्रशासनाच्या धीम्या कारभारावर संताप.

Varandha Ghat – भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट परिसरात गेल्या ५ ते ७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात हिर्डोशी ते उंबर्डे दरम्यान २० हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान, प्रशासन व ठेकेदाराने तातडीने यंत्रणा राबवून दरडी हटवल्या आणि रस्ता तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुकीसाठी खुला केला.
मात्र, आजही या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी रस्त्याच्या कडेला माती आणि राडारोड्याचे मोठे ढिगारे साचलेले दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर रस्त्याशेजारील हा राडारोडा आणि दरडींचा ढिसूळ झालेला भाग पुन्हा रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही ठिकाणे प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू असताना राडारोडा हटवण्यापेक्षा,
सध्या उघडीप असल्याने आत्ताच हे मातीचे ढिगारे पूर्णपणे हटवून संभाव्य धोका टाळणे गरजेचे आहे; अन्यथा येथे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोर-महाड मार्गावर दरवर्षी दरडी कोसळणे, रस्ता खचणे अशा घटनांमुळे प्रशासनाकडून रस्ता बंद केला जातो. यावर्षी या मार्गावर रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे.
दहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत २० हून अधिक छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्याने शंभराहून अधिक प्रवासी आणि काही वाहने घाटात अडकून पडली होती, तर स्थानिक गावांचा संपर्कही तुटला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. उंबर्डे, उंबर्डेवाडी, आशिंपी, शिळिंब, शिरगाव, वारवंड, कारुंगण तसेच दुर्गाडी आणि अभेपुरी आदी गावांतील स्थानिक नागरिकांसाठी दळणवळणाचा हाच एकमेव मार्ग आहे.





