PMC School: महापालिका शाळांच्या ‘खासगीकरणा’ला वेग? आणखी ८ शाळा खाजगी संस्थेला दत्तक
PMC School: आकांक्षा फाउंडेशननंतर आता 'आयटीच मुव्हमेंट' संस्थेकडे महापालिकेच्या ८ शाळा; प्रतिविद्यार्थी २९ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर.

PMC School – महापालिकेच्या पाच शाळा काही महिन्यांपूर्वी आकांक्षा फाउंडेशनकडे प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये दराने चालविण्यास दिल्यानंतर आता आणखी आठ शाळा आयटीच मुव्हमेंट या संस्थेकडे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रतिविद्यार्थी २९ हजार रुपये खर्च करण्यासह पुढील नऊ वर्षांसाठी अंदाजपत्रकातून निधी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
त्यामुळे महापालिका शाळांच्या खासगीकरणाला वेग मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या महापालिकेच्या आठ शाळा आयटीच मुव्हमेंट या संस्थेमार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविल्या जातात. त्यामध्ये २,२९३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, यंदा ही संख्या २,५०० पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या शाळा महापालिकेच्या इमारतींमध्येच असून,
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी महापालिकाच देते. शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन सीएसआर निधीतून केला जात होता. त्यासाठी संस्थेकडे सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होता. २०२६-२७ पासून सीएसआर निधी उपलब्ध होणार नसल्याने संस्थेने महापालिकेकडे आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. त्यास आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
या शाळा नऊ वर्षांच्या करारावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आयटीच मुव्हमेंट हीच संस्था पात्र ठरली. संस्थेने प्रतिविद्यार्थी ३३ हजार रुपये दर मागितला. त्यानुसार २,७७३ विद्यार्थ्यांसाठी वार्षिक सुमारे ९ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, शिक्षण विभागाशी झालेल्या चर्चेनंतर हा दर कमी करून प्रतिविद्यार्थी २९ हजार रुपये निश्चित करण्यात आला. याशिवाय महागाई निर्देशांकानुसार भविष्यात दरवाढीचाही प्रस्ताव आहे. यासाठी पुढील नऊ वर्षे अंदाजपत्रकातील कलम ७२(ब) अंतर्गत आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.





