PMC Protest: महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! चिलखत अन् हेल्मेट घालून विरोधक उतरले मैदानात; पाहा काय घडलं?
PMC Protest: नगरसेवक गफूर पठाण आणि भाजप लोकप्रतिनिधींमधील वादानंतर सोमवारी विरोधक आक्रमक; संबंधित नगरसेवकांना समज देण्याचे महापौरांचे आश्वासन.

PMC Protest – मागील आठवड्यात महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवक गफूर पठाण भाजप नगरसेवकांच्या झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी विरोधी पक्षांनी मुख्यसभेत आंदोलन केले. हाताला काळ्या फिती बांधून तसेच चिलखत आणि हेल्मेट परिधान करीत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत, सभागृहात नगरसेवकांना सुरक्षा देण्याची मागणी केली. विरोधकांकडून मुख्यसभा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या नवीन इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.
त्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटासह, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवकही सहभागी झाले होते. त्यानंतर आंदोलकांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेत सभागृहात शांतता राहावी तसेच भाजप नगरसेवकांना समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी महापौरांनीही संबधित नगरसेवकांना समज देण्यात आली असून त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाईल तसेच असे प्रकार होणार नाहीत सभागृहात शहराच्या विषयावर चर्चा होईल, असे आश्वासन दिले.
त्यानंतर पुन्हा मुख्यसभा सुरू झाल्यानंतर विरोधीपक्षांनी महापौरांच्या समोर येत आंदोलन केले. विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते काका चव्हाण, काँग्रेसचे गटनेते चदूशेठ कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांच्यासह अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, वैशाली बनकर आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या तसेच चिलखत आणि हेल्मेट परिधान करून निषेध व्यक्त केला.
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांविरोधात घोषणाबाजी करीत विरोधी पक्षांनी सभागृहात नगरसेवकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना संरक्षण देण्याची मागणी महापौरांकडे करण्यात आली. सभागृहातील सुरक्षेबाबत प्रशासनाला धारेवर धरत अशा प्रकारच्या घटना लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या असल्याचे विरोधकांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.





