PMC News: ‘काहीही करा पण पाण्यासाठी वणवण थांबवा!’ महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवक कडाडले
PMC News: कमी दाबाने होणारा पुरवठा आणि अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे पुणेकर हैराण; महापालिका मुख्य सभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आक्रमक.

PMC News – शहरातील पाणी संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुसरीकडे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना दोन-दोन दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दाद मिळत नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली. याशिवाय खासगी टँकरचालकांनी पाण्याचे दर वाढविल्याने आणि वेळेवर टँकर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे काहीही करा; पण नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवा, अशी आर्त मागणी नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत केली. सभागृहात नगरसेवकांकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पूर्वसूचना न देता बदललेले वेळापत्रक, टँकर उपलब्ध न होणे, अत्यल्प वेळ पाणीपुरवठा होणे, तसेच समाविष्ट गावांतील नागरिकांनाही टँकरचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या वेळी झालेल्या चर्चेत माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी पाणी बंदच्या दिवशीही काही सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली.
नगरसेविका प्रिया गदादे आणि जयप्रकाश पुरोहित यांनी झोपडपट्टी भागातील नागरिकांची घरे लहान असल्याने पाणी साठवण्याची अडचण लक्षात घेऊन त्या भागात दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. ज्या भागांत दूषित पाणी येत आहे, त्या भागांना अतिरिक्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी महापौर वैशाली बनकर, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षनेते नितीन गायकवाड यांनी केली. पेठ परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत असून, त्या ठिकाणी टँकरही पोहोचत नसल्याने स्वतंत्र पाणी व्यवस्थेची आवश्यकता असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.





